एकनाथराव खडसे

कुटुंबातून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ समाजासाठी काम करायचे या तडफेने एका शेतकरी घरातला मुलगा प्रेरित होतो आणि मग कॉलेजच्या निवडणुकांपासून सुरू झालेला प्रवास सहकारी संस्थांच्या चळवळींमधून आपल्याभोवती माणसांचे जाळे विणत विणत आणि सगळ्यांना बरोबर घेत आज सगळ्यांसाठीच एक आदर्श नेता ठरला आहे. महाराष्ट्रात २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर विविध खात्यांची मंत्रीपदे सांभाळताना आणि यापूर्वी विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना देखील एकनाथजी खडसे यांच्याद्दल महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनात असलेला आदरभाव कायमच वृद्धिंगत होत राहिला आहे.

महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील कोथळी गावात एक जून १९५२ रोजी एकनाथराव गणपताराव खडसे यांचा जन्म झाला. गाव तसं साधंच. यांचं शेतकरी कुटुंब. त्यामुळे काळ्या मातीशी जडलेलं नातं आणि शेतकऱ्यांबद्दल वाटणारी आत्मीयता ही अगदी बालपणापासूनची आहे. काळ्या मातीशी जणू रक्ताचं नातं जडलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न आणि शेतीच्या विकासाची ओढ हीच त्यांच्या कामाची प्रेरणा आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

राजकारणात प्रवेश करण्याचा विचारही कधी मनाला स्पर्शून गेला नव्हता. मात्र, लहानपणापासून शेतकऱ्यांचे प्रश्न जवळून पाहिले, शेतीच्या वाढत्या समस्या डोळ्यांदेखत काळीज पिळवटून टाकत होत्या आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक, मार्गदर्शक आणि त्यांच्या विकासासाठी झटणारा, प्रेरणा देणारा कोणीतरी पाहिजे या उद्देशाने अखेर चळवळींमधून राजकीय वर्तुळात प्रवेश झाला.

 

बालपण

एकनाथराव खडसे यांचे बालपण जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात गेले. शेतीविषयक अगदी लहान – मोठ्या गोष्टींची माहिती आणि बारकाव्यांचं बाळकडू खडसे यांना याच गावातून आणि आपल्या घरातून मिळत गेलं. एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये संगोपन झाल्यामुळे त्यांचा अशा कुटुंबपद्धतीवरच अधिक विश्वास आहे. जळगावमध्येच खडसे यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. जुनी अकरावी पद्धतीच्या शिक्षणानंतर मुंबई विद्यापीठात वांद्रे येथील चेतना कॉलेजमधून प्रि-युनिव्हर्सिटीचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. त्यानंतर बी.कॉम. पर्यंतचे शिक्षण अकोला येथे नागपूर विद्यापीठातून पूर्ण केले. याच काळात मित्रांच्या आग्रहाखातर चेतना कॉलेजमध्ये सीआर (क्लास रिप्रेझेंटेटिव्ह) होण्याची संधी मिळाली. अकोला येथे कॉमर्सला शिकत असताना पुन्हा एकदा नेतृत्त्वाची संधी चालून आली. यावेळी मात्र प्रत्यक्ष मतदान पद्धतीने निवडणूक पार पडली आणि मतदारांची संख्या अर्थात विद्यार्थीसंख्या फार नसली तरी त्यावेळी असलेल्या दोन हजार विद्यार्थी संख्येमधून बहुमतांनी विजयी होत प्रथम जीएस (गॅदरिंग सेक्रेटरी) होण्याची संधी मिळाली. त्यानंतर नागपूर विद्पीठातील यूआर(युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह) होण्याची संधी चालून आली. या निवडणुका म्हणजेच भविष्यातील जनतेतला लोकप्रिय नेता होण्याची चाहूल होती. शाळा, कॉलेजमध्ये असल्यापासून जसे नेतृत्त्व गुण उदयास आले तसेच वक्तृत्त्व कौशल्य देखील याच काळात विकसित झाले. विविध स्पर्धा, संमेलनांमधून भाग घेत असताना त्यांनी विविध विषयांवर भाषण देण्यास प्रारंभ झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अर्थातच गावाकडची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे सहाजिकच मुक्ताईनगरच्या कोथळी गावच्या दिशेने पाय वळले आणि घरातल्या शेतीत मदत करणारे हे हात कुटुंबातील जबाबदार व्यक्ती म्हणून त्या शेतीच्या विकासाकडे आणि वाढीकडे जातीने क्ष देऊ लागले.

 

शेती आणि मी

कुटुंबाची शेतकरी पार्श्वभूमी असल्यामुळे एकनाथराव खडसे यांना लहानपणापासूनच शेती कामाची आवड आहे. लहानपणापासूनच घरात शेतीची कामे पाहिलेली त्यामुळे त्यातील बारकावे आणि शास्त्रोक्त माहिती कायमच कामी येत गेली. कॉलेजमध्ये असल्यापासून शेतीला पाणी देणे, पिकांची पाहणी करणे, माती परीक्षण यापासून अनेक लहान – मोठी कामे खडसे यांनी केली आहेत. त्यामुळे शेतीची केवळ आवड नसून शेतीबद्दल आणि शेतीकामाबद्दल त्यांना एक प्रकारचा विशेष जिव्हाळा आहे. आणि हाच जिव्हाळा त्यांचा राजकीय क्षेत्रात आल्यावर शेतकऱ्यांबाबत नेहमीच दिसून आला आहे. शेती हाच एकनाथजींचा छंद आहे, असे म्हटल्यास अधिक संयुक्तिक ठरेल. त्यांना सतत नवीन प्रयोग करून पाहायचे असतात. देशा – परदेशात ज्या ज्या ठिकामी ते कामानिमित्त जातात, तेथे ते आवर्जून शेती विषयक माहिती घेतात किंवा रोपांची माहिती घेतात आणि लागलीच ते सगळे प्रयोग स्वतःच्या शेतीमध्ये आधी करून पाहतात. मूळ गावी  मुक्ताईनगर येथे स्वतःच्या जमिनीवर त्यांना अनेकविध प्रकारची झाडे, रोपे, फळझाडे लावली आहेत. शेती या विषयात काय काय नवीन करता येईल, याचा ते सतत विचार करीत असतात.

आमचे साधे बाबा

पद कोणतेही मिळो, आमचे बाबा कायम साधे कपडे वापरतात. त्यांना कधीच ब्रँडेड कपडे, गाड्या, अक्सेसरीज यांची आवड नव्हती आणि यापुढेही कधी तशी आवड किंवा हौस निर्माण होणार नाही, याची आम्हालाच काय सगळ्या कार्यकर्त्यांनाही खात्री आहे, असे अभिमानाने एकनाथराव खडसे यांच्या कन्या सौ. शारदा चौधरी सांगतात. कारण, ते स्वतः नेहमी साधं राहण्यालाच प्राधान्य देतात. पांढरा शर्ट, पांढरी पँट अशा प्रकारचे कपडे ते वापरतात. त्यांनी कधीच खूप हौसेने भारी किंवा उंची कपडे खरेदी केले नाहीत. मी कायम असाच आहे आणि असाच राहणार, मला बदलायला सांगू नका, असे म्हणत त्यांना साधा शर्ट आणि पँट असाच पोशाख कायम ठेवला. मला वेशभूषेतून बदलायचं नाही असे ते नेहमी म्हणतात. लोकांनी मला पूर्वीपासून अशाच स्वरूपातला नेता म्हणून स्वीकारलं आणि माझ्यावर प्रेम केलं, त्यामुळे मी जसा पूर्वीपासून आहे, तसाच उत्तम आहे, हे त्यांचे विधान आजही कायम आहे. विरोधी पक्षनेता असताना किंवा आता सत्तेत येऊन अनेक खात्यांचा कार्यभार सांभाळताना देखील त्यांनी कधीच महागड्या गाड्यांची मागणी केली नाही. प्रोटोकॉलनुसार जी गाडी त्यांना मिळेल, तशीच त्यांनी वापरली. राजकीय वर्तुळाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यातही त्यांनी कधीच ब्रँडेड किंवा महागड्या गाड्या वापरल्या नाहीत.

त्यांना कन्यांबद्दल विशेष जिव्हाळा आहे. समाजातही मुलींनी भरपूर शिकावे, त्यांना खूप संधी मिळाव्यात, मिळालेल्या संधींचे त्यांनी सोने करावे, अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे समाजात महिला, मुलींसाठी जे काही चांगले काम करता येईल, ज्या उत्तमोत्तम योजना राबविता येतील, त्यांना ते प्राधान्य देतात. आकाशाला गवसणी घाला, आपल्या सगळ्या क्षमतांचा आणि गुणांचा वापर करून जिद्दीच्या जोरावर मिळविता येईल, तेवढे यश मिळवा असे ते मुलींना नेहमी सांगतात.  

बाबांना एकत्र कुटुंबाची आवड आहे. त्यांचे संगोपन देखील ग्रामीण भागात एकत्र कुटुंब पद्धतीत झाले. त्यामुळे घर माणसांनी भरलेलं असावं, असं ते नेहमी म्हणतात. ते राजकारणात जेव्हा व्यग्र असतात, तेव्हा ते पूर्णपणे विकासकामे आणि राजकारणासाठी वेळ देतात. तेव्हा कित्येकदा त्यांना जेवणाची सवड देखील मिळत नाही. मात्र, जेव्हा ते कुटुंबासाठी असतात, तेव्हा ते पूर्णपणे आमचे असतात. अशा सुटीच्या दिवसांमध्ये त्यांना पत्नी, मुली, नातवंडे आणि अन्य नातेवाइकांबरोबर वेळ व्यतीत करणे खूप आवडते. त्याकाळात त्यांचा मोबाईल देखील ते बंद ठेवतात. त्यामुळे आमच्याही बाबांबद्दल कधीच तक्रारी नसतात. ते कुटुंबासाठी सामान्य कुटुंबाप्रमुखाप्रमाणे जरी वेळ देऊ शकत नसले तरी ते क्वालिटी टाइम निश्चितपणे आम्हाला देतात, तोच आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.

 

माणसात रमणारा माणूस

लहानपणी मुलांना गरजेइतका वेळ देता आला नाही, तरी त्यांच्या प्रत्येक लहान – मोठ्या गोष्टींची माहिती त्यांना अजूनही असते. इतर पालकांप्रमाणे आपल्या वडिलांनी आपल्यासाठी इतका वैयक्तिक वेळ दिला नसल्याची खंत कधीतरी मुलींना वाटते, पण जसजशी समज आली, तसतसे वडिलांचे आभाळाएवढे काम पाहिल्यानंतर त्यांच्याबद्दलची मनात असलेली खंत देखील नाहिशी झाली. ते स्वतः अतिशय मृदु स्वभावी आणि सुस्वभावी आहेत. अतिशय संवेदनशील आहेत. कुटुंब हाच त्यांचा भक्कम आधार आहे. आणि याच आधारावर त्यांची राजकीय आणि सामाजिक कार्याची घोडदौड अव्याहत सुरू हे. आतापर्यंत सामान्य जनतेने त्यांचे तडफदार व्यक्तिमत्त्वच अनुभवले आहे. विरोधी पक्षात काम करताना प्रत्येक मुद्दा मांडताना, प्रश्न मांडताना असणाऱ्या या आग्रही आणि निग्रही व्यक्तिमत्वाच्या मागे असलेला एक खूप साधा, सरळ आणि हसतमुख चेहरा सहसा कोणाला बघायला मिळत नाही. खऱ्या अर्थाने लोकांचा नेता म्हणता येईल, असेच हे व्यक्तिमत्त्व आहे. सतत माणसांचा गराडा त्यांच्या भोवती असतो. सतत कोणीतरी प्रश्न मांडायला येणार, प्रश्न सुटल्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी येणार. अशा सतत भेटी देणाऱ्या माणसांचा लोंढा सूर्योदयाबरोबर सुरू होतो आणि सूर्यास्त झाला तरी संपतच नाही, हे वास्तव आहे. त्यांना स्वतःला देखील माणसांच्या गोतावळ्यात रहायला आवडते. त्यामुळे राजकीय वर्तुळात जसे ते कार्यकर्त्यांच्या फळीने वेढलेले असतात, तसेच व्यक्तिगत आयुष्यात कुटुंबातील सदस्यांच्या गप्पांमध्येही रंगतात.

 

घरचे जेवण अमृताहुनि गोड

एकनाथजींना घरात बनविलेले जेवण अधिक प्रिय आहे. पूर्वीपासूनच पिठलं, भाकरी असे खान्देशी जेवण त्यांना अधिक आवडते. अलिकडे आरोग्याची अधिक काळजी घेण्याच्यादृष्टीने ते जेथे जातील, तेथे घरचा डबा खाणे पसंत करतात. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थ त्यांना आवडतात. मात्र, त्यातही शाकाहाराला ते अधिक प्राधान्य देतात. कोणतेही तिखट पदार्थ त्यांना सर्वाधिक आवडतात. 

 

 

संगीतविषयक अनामिक ओढ

जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणारी ही असामी खासगी आयुष्यात मात्र संगीत कलेची निस्सीम चाहती म्हणता येईल. एकनाथजी खडसे यांना चित्रपट संगीत विशेष प्रिय आहे. यामध्येही जुन्या चित्रपट गीतांचा खूप मोठा खजिना त्यांच्याकडे आहे. अगदी जुन्या दुर्मिळ टेप, रेकॉर्ड्सही त्यांच्या सांगितिक खजिन्यात बघायला मिळतील. साधारणपणे १९४० पासूनच्या विविध गीतांचा संग्रह त्यांच्या वैयक्तिक लायब्ररीमध्ये आहे. त्यांनी कौटुंबिक कार्यक्रमात पाच हजार गाण्यांचे कलेक्शन आपल्या आप्तेष्टांना भेट दिले आहे आणि याखेरीज त्यांचा संगीताचा खजिना कायम ओतप्रोत भरलेला असतो. गाण्यांबरोबरच चित्रपटांच्या डीव्हीडींचेही कलेक्शन एकनाथजी खडसे यांच्याकडे आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्यांना चित्रपट, संगीत या कलांची आवड होती. त्या जोपासता जरी आल्या नाहीत, तरी या कलांवरचे प्रेम त्यांनी संग्रहाच्या स्वरूपात कायम ठेवले आहे. अलिकडे कामाच्या व्यग्रतेत वेळ मिळत नसला तरी देखील प्रवासात ते आवर्जून संगीत ऐकतात. त्यांची विनोदबुद्धी, हजरजबाबीपणा विशेष वाखाणण्याजोगा आहे. याची प्रचिती सर्वांनाच निवडणूक काळात, सभांमधील भाषणातून आणि प्रचारांतून आली आहे. एकनाथजींना अध्यात्माची देखील विशेष आवड आहे. कीर्तन, अभंग ऐकायला त्यांना आवडतात. लहानपणापासून गावातल्या मंदिरांमध्ये त्यांनी कीर्तने, अभंग, भजने ऐकली आहेत, ते रोवलेले संस्कारांचे मूळ आजही कायम आहे. अध्यात्मिक, पौराणिक गोष्टींची केवळ माहिती नसून त्याचे त्यांना उत्तम ज्ञान आहे. या विषयावरील वाचन देखील त्यांनी लहानपणापासून केले आहे. त्यामुळे कायम भाषणांमध्ये अध्यात्मिक, पौराणिक दाखले देऊन ते जनतेवर छाप पाडतात.

 

दुर्दम्य इच्छाशक्ती

एकनाथजी खडसे म्हणजे संयम आणि दुर्दम्य इच्छाशक्ती. त्यांच्याकडे काम करण्याची प्रचंड ताकद आहे. ते सतत कार्यरत असतात. विश्रांती घेणे ही संकल्पनाच त्यांच्याकडे नाही. प्रत्येक कामात अतिशय संयमी राहतात. आयुष्यात कितीही चढउतार आले तरी ते स्वतः आपला संयम ढळू देत नाहीत. त्यांच्यात खूप मोठी इच्छाशक्ती आहे. अशक्य गोष्टी सहजरित्या शक्य करून दाखविण्याची हातोटी त्यांच्यामध्ये आहे. माणसे जोडून ठेवण्याची उत्तम कला त्यांच्यात आहे. नेतृत्त्व गुण शिकण्यासारखा आहे. त्यांची स्मरणशक्ती अतिशय तल्लख आहे. कोणत्याही व्यक्तीला ते सहजासहजी विसरत नाहीत. पूर्वी एखादे काम घेऊन आलेल्या कार्यकर्त्याचीही ते आवर्जून कालांतराने विचारपूस करतात. त्यामुळे आपोआपच त्यांच्या भोवती माणसे जोडली जातात.

 

दखल प्रत्येकाची   

एकनाथजींना सकाळी प्रथम वर्तमानपत्र वाचायला आवडते. त्यातील ताज्या घडामोडी वाचून त्यांचा दिवस सुरू होतो. अलिकडे टेक्नॉलॉजीच्या जमान्यात ते टेकसॅव्ही झाले नसले तरी व्हॉट्सअपचा वापर ते बराच करतात. व्हॉट्सअपवर आलेला प्रत्येक मेसेज ते स्वतः वाचतात आणि प्रत्येक मेसेजला उत्तर देतात. काही वेळा कामच्या व्यग्रतेत वेळ नाही झाला तरी उशिरा रिप्लाय नक्की देतात. कोणत्याही कार्यकर्त्याला नाराज करीत नाहीत. तालुकास्तरावर त्यांचे अनेक व्हॉट्सअप ग्रुप आहेत. त्या माध्यमातून ते सगळ्यांशी संपर्क ठेवून आहेत. मेसेजवर आलेल्या प्रत्येक समस्येचे, अडचणीचे आणि प्रश्नांचे निराकरण झाले पाहिजे, यासाठी ते आग्रही असतात. रोजचे चार हजारांहून अधिक व्हॉट्सअप मेसेज त्यांना येतात. मात्र, न कंटाळता वेळ मिळेल, तसे सगळे मेसेज वाचतात.  

नेतृत्त्वाचा श्री गणेशा

तत्कालीन जुनी जाणती माणसं चटकन तरूणांवर विश्वास टाकत नसत, किंवा जबाबदारीची मोठी कामं देत नसत. त्यामुळे रक्तात नेतृत्त्व गुण असतानाही कुठेतरी मागच्या फळीवर राहून काम करणे मनाला रुचत नव्हते. आपण स्वतः शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे, शेतीतले नवनवीन प्रयोग करावेत आणि शेतकऱ्यांना उन्नतीचा मार्ग दाखवावा, यासाठी अखेर खडसे यांनी धाडस करून स्वतःच सहकारी चळवळीत काम करण्यास प्रारंभ केला. इतरांच्या संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळत नसेल तर आपणच स्वतः संस्था उभारायची, त्याचे नेतृत्त्व करायचे आणि आपल्यावर विश्वास असलेल्यांना, आपल्याला प्रोत्साहन देणाऱ्या, पाठबळ देऊन आत्मविश्वास वाढविणाऱ्या आणि आपण करीत असलेल्या कामाबाबत खात्री वाटणाऱ्या लोकांना एकत्र घेऊन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी ही पहिली संस्था स्थापन केली. त्याचे संस्थापक, संचालक म्हणून काम बघत असतानाच अनेक अनुभव येऊ लागले आणि शिकण्याची संधी मिळू लगाली. आपणच संस्था स्थापन करायची, निर्णय आपणच घ्यायचे आणि त्यातूनच शिकायचे असा प्रवास सुरू झाला. तेलबिया उत्पादक संघ, पीक संरक्षण सहकारी संस्था, औद्योगिक सहकारी संस्था, तालुका सरपंच युनियन, तालुका खरेदी विक्री संघ अशा टप्याटप्याने अनेक संस्था आणि संघटना सुरू झाल्या आणि बरोबरीने प्रत्येक संस्थेसाठी माणसेही जोडली गेली, जी आजपर्यंत एकनाथजींना साथ देत आहेत.

समाजवादी काँग्रेस, पुलोद आघाडी अशांना सामोरे जात सलग सहा वेळा मुक्ताईनगरमधून मतदारांनी आमदार होण्याची संधी दिली. सामान्यांबरोबर काम करण्याची मिळालेली संधी खूप काही शिकवून गेली. माणसे वाचायला मिळाली. लोकांची लहान लहान कामे करण्यापासून प्रारंभ केला. ज्यामुळे आत्मविश्वास निर्माण झाला आणि लोकांनाही नेता म्हणून विश्वास वाटू लागला, जो आजपर्यंत कायम आहे. 

 

माझे आदर्श

आयुष्यात मार्ग दिसण्यासाठी म्हणा किंवा ध्येय प्राप्त करण्यासाठी किंवा पाठीवर हात ठेवून कोणीतरी लढ म्हणण्यासाठी एक व्यक्ती किंवा आदर्श असलाच पाहिजे. अनेक सामाजिक कार्यातून पुढे येत असताना १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाचा तालुका उपाध्यक्ष, संघटक अशी कामे एकनाथजी खडसे यांनी केली. संघटनेच्या माध्यमातून राजकीय प्रवासाला प्रारंभ झाला. याच प्रवासात नानासाहेब उत्तमराव पाटील भेटले. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांसारखी दिग्गज, अनुभवी आणि मातब्बर राजकारणी मंडळी भेटली. यांनी खूप शिकविले. यांचा मिळणारा सहवास नकळत अनेक गोष्टी शिकवून जात असे. याच काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यांच्या उपक्रमांमध्ये भाग घेतला. संपर्काचा वर्ग वाढत गेला. आणि संघटनेला मजबुती येत गेली. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे आक्रमक म्हणूनच कायम परिचित होते. त्यांच्या संपर्कात आल्यानंतर हळूहळू ते खूप आवडायला लागले. माझा आदर्श बनले.  

 

 

लोकप्रिय नेते

श्री. एकनाथराव खडसे हे अतिशय लोकप्रिय नेते आहेत आणि १९९५ पासून मुक्ताईनगर मधून ( पुर्वीचे एदलाबाद) सलग पाच वर्षे विधानसभेत निवडून आलेले नामवंत लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील विविध मुद्दे तसेच विशेषतः महाराष्ट्रातील ज्वलंत विषय विधानसभा अधिवेशनापर्यंत पोचविले. त्यांच्या उल्लेखनीय अशा वक्तॄत्वाने त्यांनी नेहमीच अधिवेशनात छाप पाडली आहे. शेतकर्यांच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न ते नेहमीच करतात.

एक सिंचन मंत्री म्हणून त्यांनी १९९७ ते १९९९ ह्या कालावधीमधे संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक सिंचन प्रकल्प मंजूर केले तसेच अपूर्ण प्रकल्प पूर्ण केले. कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत पाटबंधारे प्रकल्पांना गती दिली. विशेषतः " आधी पुनर्वसन, मग पाटबंधारे प्रकल्प " असा पुरोगामी निर्णय घेतला. या कालावधीमधे, त्यांनी उत्तर महाराष्ट्रासाठी तापी खोरे महामंडळाची स्थापना केली व खानदेशातील रुपये ५००० कोटीचे प्रलंबीत प्रकल्प पूर्ण केले. त्यांनी मुक्ताईनगर जिल्हयातील २५०० कोटी रुपयांच्या उपसा सिंचन प्रकल्पांना मंजूरी देऊन उत्तेजन दिले.

द्रष्टा

श्री खडसे हे अतिशय नम्र व्यक्तिमत्व आहे. स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना शेतकयांच्या आणि सामान्य माणसाच्या गरजांबद्दल जाणिव व सहानुभूती आहे. त्यांच्या कार्यातून त्यांनी लोकांच्या समस्या सोडवून लोकांपर्यंत पोचण्याचा यशस्वी प्रयत्न केला. अतिमहत्त्वाची कामे सुध्दा त्यांच्या नेतृत्त्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली. कोयना खोरे पाणी धारणेतील महत्त्वाचे काम त्यांनी अंतिम मुदतीपूर्वीच पूर्ण केले. कोयना जलविद्युत प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा पूर्ण झालेला जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प हा कोयना नदीवरील सर्वात मोठे धरण व ईतर ३ अशा चार धरणांवर आधारित असा अत्यंत जटील प्रकल्प आहे. त्याचे प्रकल्प स्थळ सातारा जिल्ह्यातील पाटण जवळ असून तेथील हेलवाक या गावाला आता कोयनानगर म्हणून ओळखले जाते. या संपूर्ण प्रकल्पाचे एकूण क्षमता १९६० मेगवॆट आहे. या प्रकल्पात वीजनिर्मितीच्या चार टप्प्यांचा समावेश आहे. सर्व जनित्र हे पश्चिम घाटाच्या पर्वत रांगामधे उत्खनन करुन खोल ठेवले आहेत. या प्रकल्पाने वीजनिर्मितीत महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. या प्रकल्पाच्या वीजनिर्मितीच्या क्षमतेमुळे कोयना नदीला महाराष्ट्राची जीवनदायिनी म्हणून ओळखले जाते.

शेतकयांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेउन त्यांच्या समस्यांचे कायमस्वरुपी निवारण करण्यात त्यांचे विशेष योगदान आहे. कृत्रिम पावसासारखे प्रकल्प राबवून दुष्काळाची समस्या काही प्रमाणात दूर केली.

महसूल खात्यातील महत्त्वाच्या निर्णयांमुळे सामान्य जनतेसाठी किचकट अशी कामे सोपी झाली.

सुधारक

श्री. एकनाथ खडसे यांना राजकीय कामांबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक तसेच शैक्षणिक कामाची देखील आवड आहे. ते १९९० पासून पुणे विद्यापीठाचे सर्वोच्च नियामक मंडळाचे सदस्य आणि २००२ पासून आजपर्यंत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे व्यवस्थापकीय समिती सदस्य म्हणून कार्यरत आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून काम करतांना राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक अशाप्रकारे राज्यभरात ३५८ आयटीआय संस्थांची स्थापना केली. या आयटीआय संस्थांमधे ३० % जागा मुलींसाठी व २% जागा काश्मिर मधील हिंदू शरणार्थींसाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी ट्र्स्ट रुग्णालयांमधे १०% जागा बीपीएल लाभार्थींना राखीव ठेवण्यासाठी सरकारला भाग पाडले.

त्यांनी ओबीसी कर्मचारी व अधिकारींच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या प्रत्येक टप्प्यात सरकारवर सतत दबाव आणला. त्यांच्या प्रयत्नातून शेकडो लाभार्थींनी मूत्रपिंडाचे आजार, हृदय रोग, मेंदू रोग, कर्करोग यासाठी "जीवनदायी आरोग्य योजना " आणि "मुख्यमंत्री मदत निधीचा लाभ घेतला. एक सिंचन मंत्री म्हणून २ वर्षात त्यांनी अनेक सिंचन प्रकल्पांना मंजूरी दिली व अपूर्ण प्रकल्प पूर्ण केले. त्याचबरोबर कृष्णा खोरे महामंडळांतर्गत अनेक चालना प्रकल्प पूर्ण केले. " आधी पुनर्वसन, मग पाटबंधारे प्रकल्प " असा त्यांचे सिंचन मंत्रीपदावर असताना ब्रीदवाक्य होते.

त्यांनी उत्तर महाराष्ट्र तापी खोरे विकास महामंडळाची स्थापना केलि. त्याअंतर्गत ५००० कोटी रुपयांची प्रलंबित कामे २ वर्षात पूर्ण केली.